PostImage

Sajit Tekam

Jan. 7, 2025   

PostImage

Bhandra News: घर सोडून गेलेल्या युवकाचा दोन महिन्यानंतर सापडला मृतदेह


Bhandra News: लाखांदूर : वडिलांनी रागावल्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या कोच्छी येथील 24 वर्षीय युवकाचे प्रेत गावालगतच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मास गळलेल्या आणि सडलेल्या स्थितीतील प्रेत पोलिसांनी गावकरी आणि त्याच्या पालकांकडून शहानिशा करून ओळखले. विनोद ताराचंद मेश्राम असे या मृत युवकाचे नाव आहे.

मागील 2 महिन्यांपूर्वी वडिलांनी हटकले असता नाराज झालेल्या मुलाने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोच्छी येथील जंगल परिसरात या घटनेचा उलगडा झाला.

विनोद मेश्राम हा युवक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चुलबंद नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. वडिलांनी त्याला मोबाइलवर कॉल केला, पण विनोदने कॉल रिसिव्ह केला नाही. यावर रागावलेल्या वडिलांनी त्याला घरात परतल्यावर हटकले. त्यामुळे नाराज झालेल्या विनोदने घर सोडले आणि दोन महिन्यांपासून तो बेपत्ता झाला होता.

6 जानेवारी रोजी काही महिला जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांनी एका झाडाला लटकलेल्या मृतदेहाची ओळख घेतली. मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत होता, आणि दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या विनोदचा तो प्रेत होता. महिलांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. विनोदचे पालक व पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रेताची ओळख पटवली.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले असून, वडिलांच्या रागावरून युवकाने आपला जीवन संपवले.